[+]Feedback

+

 

सह्याद्री हिरकणी सन्मान सोहळा – २०१५

सह्याद्री हिरकणी – महाराष्ट्राच्या नऊ कर्तबगार वीरांगनांना सलाम

अकरावा सह्याद्री हिरकणी पारितोषिक सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात, मुंबई गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ०७.०० वाजता साजरा करण्यात आला.

कर्तबगार स्त्री म्हणजे सामर्थ्य असलेली स्त्री, सकारात्मक प्रभाव असणारी स्त्री आणि अर्थपूर्ण जगणारी स्त्री. सह्याद्री हिरकणी पारितोषिक ही संकल्पना श्री. मुकेश शर्मा, अपर महानिदेशक – दूरदर्शन यांची. या सह्याद्री हिरकणी पारितोषिकांनी महाराष्ट्रातील नऊ प्रथितयश स्त्रियांना गौरविण्यात आले. या स्त्रियांनी केवळ धैर्याने आणि निश्चयाने पुरूषप्रधान क्षेत्रांमध्ये प्रभावी काम केले आहे आणि समाजामध्ये योग्य तो बदल घडवून आणलेला आहे.

या पारितोषिकांची निवड श्रीमती नीला सत्यनारायण (निवृत्त राज्य निवडणुक आयुक्त – महाराष्ट्र), श्रीमती स्मिता जयकर (फिल्म आणि टिव्हीवरील प्रसिध्द कलाकार), श्री विक्रम गोखले (फिल्म आणि टीव्हीवरील ज्येष्ठ कलावंत), श्री. सुंदर चंद ठाकूर (संपादक - नवभारत टाइम्स वृत्तपत्र) या स्वतंत्र आणि प्रख्यात व्यक्ती असलेल्या निवड मंडळाने केले.

अकराव्या पारितोषिक सोहळ्यात सन्मान प्राप्त केलेल्या नऊ हिरकणी :

श्रीमती सुरेखा दळवी : गेल्या पाव शतकाहून अधिक काळ जमीन हक्क आंदोलनकर्त्या सुरेखाताई महाराष्ट्रातील निसर्गरम्य कोकणामधील आदिवासींच्या जमीन मालकी हक्काबद्दल लढा देत आहेत. लढाऊ बाण्याच्या सुरेखाताई आणि त्यांचे सहकारी हा लढा आदिवासींच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग म्हणून ध्येयवादीपणे चालवीत आहेत.

डॉ. कल्पना खराडे : “दृष्टीहीन द्रष्ट्या” असलेल्या डॉ. कल्पना खराडे यांनी दृष्टी गेलेली असतानासुध्दा शिक्षणाची शिखरे सर केली. त्या मुंबई महानगर पालिकेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये तसेच खाजगी शाळांमध्ये एलिमेंटरी शिक्षिका होत्या. केवळ जिद्दीने आणि सातत्याने त्या व्यावसायिकतेची नवनवी शिखरे पार करत गेल्या. सध्या त्या के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ एज्युकेशन, ट्रेनिंग अँड रिसर्चच्या उपाध्यक्षा आणि मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शक आणि असोसिएट प्रोफेसर आहेत.

श्रीमती मालती वामन जोशी : गेल्या ३० वर्षापासून त्यांची “चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ” ही संस्था सामाजिक आणि आर्थिक दुर्बल गटांतील स्त्रिया आणि मुले यांना सक्षम बनविण्यासाठी कार्यक्रम राबवीत आहे. त्यांच्या “संस्कार वर्ग” या प्रकल्पाने वंचित वस्त्यांमधील पौगंडावस्थेतील अनेक मुलांना फायदा झालेला आहे. संस्कार वर्गाच्या कार्यक्रमांमध्ये अभ्यासिकांचा तसेच व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचा समावेश असतो. तसेच नियमित आरोग्य शिबिरे घेऊन आरोग्यसंबंधित अनेक सेवा त्यातून पुरविल्या जातात.

श्रीमती शोभना साखरवडे : साखरवडे मूळच्या बनारसच्या. “प्रकृति” या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत आहेत. उपजीविका करणे, मुलांचे शिक्षण पार पाडणे आणि सामाजिक दडपणे सहन करणे ही स्त्रियांच्या, विशेषतः मागासलेल्या भागातील स्त्रियांच्या पुढील सर्वात मोठी आव्हाने आहेत हे जेव्हा साखरदांडेच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. ज्या स्त्रियांना मदत मागण्याइतका सुध्दा आत्मविश्वास नाही अशा स्त्रियांपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी स्थानिक संसाधन संघ सुरु केले. अशा प्रकारे स्त्रियांमध्ये आत्मविश्वास बाणवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य त्यांची संस्था करत आहे.

श्रीमती अनुराधा भोसले :  श्रीमती भोसले कोल्हापूरमधील तळागाळातील स्त्रियांच्या हक्कांसाठी आणि बाल-मजुरी प्रतिबंधासाठी कार्यरत आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी स्वतः बालमजुरीचे चटके सहन केले आहेत. लहान मुलांचा गैर फायदा घेणे, त्यांना कामाला ठेवणे, वेश्याव्यवसायात अडकवणे तसेच स्त्रिभ्रूणहत्त्या याविरुध्द गेली २० वर्षे त्या लढत आहेत. “अवनी” संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. त्यांच्यामुळे ५४१ बालमजुरांची सुटका करणे, शाळेतून गळालेल्या आणि स्थलांतरीत भटक्या अशा ५६०४ मुलांना आरोग्यशुश्रुषा आणि शिक्षण मिळवून देणे, वीटमजूरांच्या वस्त्यांमध्ये शाळा उभारणे, स्थलांतरित मुलांसाठी निवासी घर स्थापन करणे अशी कामे शक्य झाली आहेत.

 श्रीमती रजनी लिमये : मानसिक आव्हानांचा सामना करणा-या व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणा-या “प्रबोधिनी ट्रस्ट” च्या श्रीमती लिमये संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. या संस्थेचे कार्य प्रौढ मानसिक आव्हानित व्यक्तींना प्रशिक्षण देणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे आहे. येथे या व्यक्ती असे प्रशिक्षण मिळवितात ज्यायोगे त्या स्वतंत्र, स्वावलंबी बनतात आणि समाज आणि कुटुंबाचा निर्मितीशील भाग होतात. अशा प्रकारे त्या प्रतिष्ठित आयुष्य जगू शकतात. संस्थेच्या प्रकल्पांच्या विविध कामांमध्ये भाग घेणारे ३०० विध्द्यार्थी पटावर आहेत.

डॉ. नीता ताटके : “क्रीडा मानसशास्त्र” यांमध्ये डॉ. ताटके पीएचडी आणि तज्ज्ञ / प्रशिक्षक आहेत. त्या भारतीय पारंपारिक क्रीडाप्रकार मलखांब यात मुलींना प्रशिक्षण देतात. डॉ. ताटकेंनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तसेच पहिल्या जर्मन मलखांब दौ-याचे संयोजन त्यांनी केले आहे.

सिस्टर वैशाली रूइकर : सिस्टर रूइकर यांनी पुण्यामध्ये ऑक्झिलरी आणि मिडवाइफरी नर्सचे शिक्षण घेतले. गेली ४५ वर्षे त्या दर दिवशी आपल्या रूग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी झटत आहेत. विशेषतः अंथरूणावर पडून राहील्यामुळे होणा-या व्रणांचे ड्रेसिंग करण्यात त्या निष्णात आहेत. त्यांची प्रकृती खालावत आहे, तरीही आपल्या अविचल कार्यनिष्ठेमुळेच त्या आजही काम करू शकतात. आजच्या धावपळीच्या जगात अंथरुणाला   खिळलेल्या रुग्णांची काळजी घेणे कठीण झाले आहे. १९९४ सालीच त्यांनी याबद्दल विचार केला आणि “पेशंट-केअर ब्युरो” ची संकल्पना साकार केली. त्यांना “राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पारितोषिक,२०१४“ सुध्दा मिळालेले आहे.

श्रीमती रोहिणी लिमये : श्रीमती लिमयेंनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात अपंगांची स्वेच्छा सेवा करणारी समाजकार्यकर्ती म्हणून केली. नंतर त्या बहि-यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षित शिक्षिका बनल्या. १९६६ मध्ये स्थापन झालेल्या जानकीबाई शिक्षण संस्था, विकास विद्यालयाच्या त्या संस्थापक विश्वस्त आहेत. येथे बहि-या विद्यार्थ्य़ांना योग्य शिक्षण दिले जाते. तसेच योग्य असे श्रवणसाधन दिले जाते जे बहिरेपणासाठीचा एकमेव उपाय आहे. या संस्थेने राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीमध्ये “अपंगांसाठी सर्वोत्कृष्ठ शाळा” हा राष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळविला आहे.

आपल्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणा-या स्त्रीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी एक खास “हिरकणी विशेष सन्मान” दिला जातो. यावर्षी या विभागात श्रीमती उर्मिला पवार यांना हा पुरस्कार दिलेला आहे. उर्मिलाताई दलित संस्कृती आणि स्त्रियांचे प्रश्न आपल्या साहित्यातून मांडत असतात. त्या मराठीतील एक अत्यंत प्रथितयश लेखिका मानल्या जातात. स्वतःकडे त्या एक स्त्री, एक दलित आणि एक बौध्द अशा पाहतात आणि त्या परिप्रेक्ष्यातून त्यांच्या कथा आकार घेतात. “आईदान”  ही त्यांची आत्मकथा आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचे भाषांतर ‘द वीव्ह आँफ माय लाइफ – अ दलित वुमन्ज मेमाँयर्स’ या नावाने झाले आहे. त्यांचे अलीकडचे पुस्तक आहे “मदर विट”. यात त्यांच्या धैर्याच्या, जिद्दीच्या, चैतन्यमयी कथा आहेत ज्या दलित साहित्याचा तसेच भारतीय स्त्रीवादी साहित्याचा महत्त्वाचा भाग आहेत.

या हिरकणींनी हे पुरस्कार श्री. अनिल वासवानी (मुख्य संपादक – इंडियन टेलिव्हिजन डाँट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड), श्री. रवींद्र आवटी (प्रेसिडेंट काँर्पोरेट अफेअर्स – रिलायन्स इंडस्ट्रीज), श्रीमती किरण जुनेजा (चित्रपट आणि टीव्ही मान्यवर), श्री. भरत दाभोळकर (अभिनेता आणि दिग्दर्शक), महेश कोठारे (चित्रपट आणि टीव्ही मान्यवर), ऐश्वर्या आणि अविनाश नारकर (चित्रपट आणि टीव्ही मान्यवर), श्री. किरण शांताराम आणि इतर अनेक मान्यवरांकडून स्वीकारले.

“सह्याद्री हिरकणी सन्मान सोहळा” हा कार्यक्रम डीडी सह्याद्री वाहिनीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवार ८ मार्च २०१५ ला दुपारी ४:३० वाजल्यापासून प्रक्षेपित केला जाईल.

सुशिलेचा देव

Live TV